'हे ईश्वरराव... हे पुरुषोत्तमराव...’ या श्याम मनोहर यांच्या
आगळ्यावेगळ्या कादंबरीचे डॉ. हरिश्चंद्र थोरात यांनी संरचना, आशयसूत्रे, जीवनदृष्टी, भाषा अशा अंगानी केलेले विस्तृत, सूक्ष्म आणि या कादंबरीविषयी मर्मदृष्टी देणारे विश्लेषण म्हणजे हे पुस्तक होय.
हे विश्लेषण जसे मर्मदृष्टी देणारे आहे, तसेच ते वेधक आणि वाचकाच्या विचारप्रक्रियेला चालना देणारेही आहे. अभ्यासामध्ये सखोलता असली की, साहित्यकृतीचे विश्लेषण केवळ तांत्रिक न राहता ते सर्र्जनशील कसे होते, त्याचाही प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो. दुर्बोध वाटणाऱ्या या कादंबरीची कल जे. कृष्णमूर्तींच्या तत्वज्ञानात कशी आहे, ते डॉ. थोरात यांनी साधार आणि तपशिलाने स्पष्ट केले आहे. परंतु याबरोबरीनेच या तत्वज्ञानाच्या प्रभावाखाली राहिल्यामुळे ही कादंबरी ‘अनेकआवाजी’ न होता ‘एकआवाजी’ कशी होत जाते, तेही त्यांनी दाखवले आहे. यासाठी त्यांनी मिखाईल बाख्तीन यांच्या ‘संवादवादा’चा केलेला उपयोग लक्षणीय स्वरूपाचा आहे.
मराठीमध्ये एखाद्या विशिष्ठ साहित्यकृतीच्या अनेक अंगांनी केलेल्या विस्तृत विश्लेषणाची परंपरा विरळच आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, रा.भा. पाटणकर अशी काही अपवादात्मक नावे या संदर्भात सांगता येतात. प्रस्तुत पुस्तक या परंपरेत महत्वाची भर घालणारे पुस्तक ठरावे.