सत्य आठवणी व काल्पनिक प्रसंग यांना विनोदाचा मसाला लावून द्वैअर्थी शब्दांची फोडणी देऊन डॉ. नंदकमुार उकडगावकर यांनी लिहिलेल्या अठरा लेखांचं पुस्तक आहे ‘हेल मेट्स.’ शाब्दिक कोट्या हा या पुस्तकाचा गाभा! रोजच्या वापरातील शब्दांना वेगळे संदर्भ लावून हास्य फुलवता येते हे दाखवण्यासाठी केलेला हा खटाटोप. या लेखसंग्रहाचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे -अर्धा शब्द मराठीतला व अर्धा इंग्रजीतला घेऊन काही नवीन शब्द तयार केले आहेत. त्यामुळे उच्चार जरी सारखा असला तरी त्यातून दोन वेगवेगळे अर्थ निघतात. उदा. बायो व MATRIC • बायोमॅट्रिक. या शिवाय प्रचलित शब्दांना नवे अर्थ लावण्याचा प्रयत्नही त्यांनी केला आहे. उदाहरणार्थ पाठ्यपुस्तक • पाठीवरचा मजकूर. ‘सवंगडी,’ ‘माझे हेल मेट्स,’ ‘माझं पाषाणयुग,’ ‘माझं पाठ्यपुस्तक,’ ‘आमची स भु’ या लेखांमध्ये शाळेतील आठवणी आहेत. सोबत आत्मचरित्राच्या जवळपास जाणारे ‘माझं ‘कृष्णा’यण,’ ‘आमचं ‘वैद्य’कीय महा ‘विद्या’लय,’ ‘किस्सा एमडीचा’ व ‘मा मा (माझी मास्तरकी)’ लेखही आहेत.