हेलन ही केवळ अत्यंत सुंदर स्त्री म्हणून इथे भेटत नाही, अत्यंत बुद्धिमान आणि युक्तिवादात पटाईत अशी सौंदर्यवती व्यक्ती म्हणून भेटते.
तीन हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ग्रीक महाकाव्यातल्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या परस्पर नातेसंबंधांना एर्स्काइननं आधुनिक संवेदनांचं परिमाण दिलेलं आहे.
एवढंच नव्हे तर त्या काळी त्यानं हे जे आधुनिक परिमाण त्यांना दिलंय, ते आज, एकविसाव्या शतकातही आधुनिक ठरतंय. म्हणजे एक प्रकारे चिरंतनच.
त्यातच एर्स्काइननं या चिरंतन संवादांना आपल्या मिश्किल शैलीची डूब दिली आहे. हेलनच्या या कथेचा भर मख्यत: कथेच्या निमित्तानं प्रेम आणि विवाह-संबंध,
वैवाहिक जीवन आणि मन:पूत जगण्याची लालसा, नैतिकतेच्या सामाजिक धारण आणि जगण्याच्या नैसर्गिक ऊर्मी यांचा ऊहापोह करण्यावर आहे.
संपूर्ण कादंबरी संवादातून उलगडत जाते. हेच, असेच संवाद-विसंवाद जगाच्या पाठीवर कोणत्याही भाषेत ऐकायला मिळू शकतात. या कथेचा मराठी अनुवाद प्रसिद्ध करायला मोह झाला, तो म्हणूनच!