'जिप्सीच्या वाटा' हे आनंद माडगूळकर याचं दुसरं पुस्तक. हे वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षानं लक्षात येते की, एका रसील्या नादिष्ट आणि गोष्टीवेल्हाळ माणसाचं हे कथन आहे. चित्रपट आणि तदनुषंगिक कला यांचं या माणसाला नुसतंच अप्रूप नाही; तर त्यातला सारा रस शोषून घेण्याची आणि बारकाईनं निरीक्षण करण्याची वृत्ती त्यानं जोपासली आहे. कथनाच्या ओघात अनेक लहानमोठी व्यक्तिचित्रं, आठवणी, घटना यांचा एक मनभावक गोफ हा लेखक विणत जातो. आणि हे सारं सांगत असताना त्याच्या ललित लेखणीला एक प्रकारची लोभस नि खुमासदार शैली लाभली आहे. लेखणीलाच जणू एखादा मिनी कॅमेरा जडवावा तशी चित्रमयता त्यांच्या साऱ्याच लेखनातून प्रत्ययाला येते. लेखनभर खेळत राहणारी प्रसन्नता हा तिचा प्रधान गुण म्हणता येईल. हे सारं लेखन म्हणजे एकीकडे चित्रपटसृष्टीतला विशिष्ट कालावधीतला दस्तऐवजही ठरेल.
-आनंद अंतरकर