१९२० ते १९२५ या पाच वर्षांच्या संक्रमणकाळानंतर मराठी ललित वाङ््मयात नवनवीन लेखकांनी आपापली वैशिष्ट्यपूर्ण दालने उघडली. विनोदाच्या क्षेत्रात चिंतामण विनायक जोशी यांनी आपली स्वतंत्र; परंतु खणखणीत नाममुद्रा उमटवली. याआधी मराठीतील विनोदाचे स्वरूप निबंधासारखे होते. चिंतामणरावांनी त्याला गोष्टीचे वळण दिले. त्यांच्या प्रतिभेने आजवर लाखो वाचकांना हसवले आहे. आपल्या दु:खांची शल्ये बोथट करून घेण्याच्या कामी त्यांना साहाय्य केले आहे. एकीकडे गुदगुल्या करीत, दुसरीकडे त्यांना आपल्या लहानमोठ्या विसंगतींची जाणीव करून दिली आहे. व्यक्तिजीवनातल्या आणि समाजजीवनातल्या अनेक नव्याजुन्या विसंवादी गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. विविधता, सरसता व वास्तवता ही त्यांच्या विनोदशैलीची गुणवैशिष्ट्ये म्हणता येतील. या छोट्याशा पुस्तकात वानवळा म्हणून संग्रहीत केलेल्या त्यांच्या निवडक सहा विनोदी कथांवरून त्यांच्या बाह्यत: अत्यंत साध्या दिसणाया, पण विलक्षण मार्मिक असलेल्या विनोदीदृष्टीचा संचार किती अप्रतिहत आहे, हे वाचकांना सहज कळून येईल.