९७ बोधकथांचा हा संग्रह म्हणजे संस्कारांची शिदोरीच आहे. या छोट्या छोट्या बोधकथांच्या शेवटी कथेतून काय बोध घ्यावा आणि त्यासाठी कोणता संकल्प करावा हेदेखील मुलांना सांगितले आहे. लहान वयात मुलांच्या कोवळ्या मनावर जे संस्कार होतात, ते पुढे दीर्घ काळ टिकवून राहतात. मुलांच्या कोवळ्या मनावर ज्ञानदा नाईक यांच्या या बोधकथा नक्कीच प्रभाव पाडतील. या कथांमधून नम्रता, सहकार्य, विश्वास, संयम, आदर, प्रामाणिकपणा यांसारखी मूल्ये बालकांच्या मनावर रुजवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मित्र-मैत्रिणी, नातेसंबंध त्यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या बोधकथा त्यांनी लिहिल्या आहेत. या कथा सांगताना त्यांना परी, यक्ष, जादू अशा मुलांच्या कल्पनांमध्ये असणाऱ्या शब्दांचा छान वापर केला आहे. मुलांनी आपले स्वभावगुण ओळखावेत, डायरी लिहावी, आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करावा, क्षमाशील व्हावे, चांगल्या सवयी अंगी बाणवाव्यात, निसर्गावर- प्राणिमात्रांवर प्रेम करावे असे संदेश या बोधकथा देतात. मनोरंजन आणि संस्कार यांचा सुरेख मेळ या कथांमधून ज्ञानदा नाईक यांनी घातला आहे.