गोंधळ हे महाराष्ट्राचे अध्यात्मप्रधान प्राकृतिक लोकनाट्य आहे. अनंत काळापासून नांदत आलेली कृषिसंस्कृती, त्यातून व्यक्त होणार्या ग्रामीण जीवनातील प्रतिमा, जनमानसात रुजलेले लोकाचार याला रंजकतेने नटवीत लोकसंस्कृतीचा एक सहजसुंदर आविष्कार गोंधळाने घडविला आहे. आध्यात्मिक किंवा दैव उद्बोधन, सामाजिक प्रबोधन आणि लौकिक लोकरंजन घडवीत, तसेच बदलत्या काळातील विविध स्थित्यंतरांतून वाटचाल करीत गोंधळाची परंपरा आजही समर्थपणे उभी आहे. प्रस्तुत पुस्तकात लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी गोंधळ परंपरेचे स्वरूप आणि आविष्कार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासकांना आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी ज्यांना कुतूहल आहे, अशांना हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.