लग्न हा एक संस्कार, विधी, समारंभ म्हणून मानला जात असला तरीही तो खरा संस्कृतिदर्शक आहे. उच्चभ्रू लोक सोडले तर लग्नविधींचा अभ्यास हा त्या विशिष्ट भूप्रदेशाचा, तेथील जनजातींचा अभ्यास आहे. केवळ सांस्कृतिकच नव्हे तर समाजशास्त्रीय, मानववंशशास्त्रीय, आर्थिक,सामाजिक, कौटुंबिक आणि गावातील जाती-जमातीतील परस्पर संबंधांचा अभ्यास आहे. तद्वत् हा सामाजिक इतिहास आहे आणि या नजरेतून एकूण लग्नविधींचे परिशीलन आणि त्यावर चिंतन, मनन केल्यास इतिहासातील सनावळी सोडून इतर अनेक घटकांवर प्रकाश पडू शकतो.