अनुवादातून अन्य भारतीय भाषांमध्ये पोहोचलेली आणि दुसर्या भाषकांकडून कौतुकवती झालेली तुझी कविता आता संग्रहरूपाने येते आहे, हे ऐकून आनंद झाला. समकालीन कवितेच्या कोरसात तुझी भावकविता स्वतंत्र आत्मस्वर ऐकवणारी आहे. सामाजिक विचारसरणीची प्रतिरूपे या
कवितेत आढळत नाहीत, मात्र वर्तमानाच्या पक्व भानाचे परिमाण या कवितांना लाभले आहे. मराठी कवितेत पहिल्यापासूनच भावविवशता खूप आढळते. पण अनुभव व्यक्त करतानाची अलिप्तता तुझ्या कवितेला भावविवशतेपासून बव्हंशी दूर ठेवते. वर्तमानाचे पक्व भान आणि भावविवशता टाळण्यातील यश हा तुझ्यातील पत्रकाराने कवीला करून दिलेला लाभ असला पाहिजे. तुझी प्रेमकवितांची माळका, प्रेम व मैथुनाचे संदर्भ देत त्या पलीकडच्या सर्जनाच्या शक्यता अजमावते. मृत्यूविषयक
कवितांची माळकाही जगण्याची ओढच वेगळ्या तर्हेने व्यक्त करते. भारतीय आध्यात्मिकतेचे संस्कार जपणार्या तुझ्या कवितेला आपल्या जगण्याचा मूळ संदर्भ काय, त्याचा अर्थ काय, हे तपासून घेण्याची ओढ आहे. यातून उदासीनता येण्याचा असणारा धोका टाळून तुझी कविता नेहमीच सूर्योपासना करणारी, उजेडाचे गाणे गाणारी झाली आहे. तुझा हा आविष्कार खोलवर भावणारा आहे...
- डॉ. आलोक दासगुप्ता
(समकालीन भारतीय कवितेचे अभ्यासक)