चर्मकार समाजात जन्मलेल्या आणि मुंबईतल्या फुटपाथवर वाढलेल्या श्री. रवींद्र बागडे यांची ही आत्मकथनात्मक कादंबरी. यातला ‘ना-या’ हे लेखकाचंच प्रतिरूप. कमालीचं दारिद्र्य, दारूच्या व्यसनापायी कुटुंबाची धूळधाण करणारा बाप आणि नव-याच्या छळाला तोंड देत सात पोरांच्या कुटुंबाच्या पोटाला घालण्यासाठी मरेमरेस्तोवर कष्ट करणारी आई; सोबतीला गलिच्छ फुटपाथवरचं जनावरांच्या मोलानं जगणं आणि भोवताली बहुरंगी, बहुढंगी मुंबई हे ना-याचं प्राक्तन. त्यामुळे त्याच्या कोवळ्या भावविश्वात अनेक ‘जहरी’ अनुभवांचं ‘गटुळं’ आहे. त्यामुळे या आत्मकथनात केवळ चर्मकार समाजाचं दर्शन घडत नाही, तर गाळात रुतलेल्या माणसाच्या जगण्याच्या धडपडीचं आणि आपल्यासारख्या रुतलेल्यांना हात देण्याच्या जिद्दीचं वास्तव चित्र उमटलेलं आहे. यातलं फुटपाथवरचं वातावरण, वेश्याव्यवसायाचं जग, रेस, जुगार यांचं विदारक चित्रण पांढरपेशा मनाला धक्का देणारं आहे ! आज असंख्य माणसं या परिस्थितीत जगतायत्. याला जबाबदार कोण? बालमजूर प्रतिबंधक कायदा नेमका कोणासाठी? यांच्या पोटाची सोय होत नाही, तोवर ही मुलं धंदापाणी सोडून शिकणार कशी? बोलभाषेत सहज उलगडत जात ही कादंबरी परिस्थितीचं विदारक दर्शन घडवते व वाचकांना अंतर्मुख करते.