लग्नानंतर कोणत्याही विवाहित स्त्रीला ‘विशेष बातमी’ समजल्यानंतर घरातल्या मोठ्यांकडून तिच्यावर सूचनांचा आणि सल्ल्यांचा भडिमार होतो. पिढ्यानपिढ्या आणि परंपरेनुसार कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत याची साधारण कल्पना आपल्याला असते. परंतु आजच्या बदललेल्या जीवनशैलीत अनेकविध पाश्चिमात्य पदार्थ व बाहेर बनणारे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात आपण सर्रास खातो. या बऱ्याचशा पदार्थांमध्ये काही अपायकारक जिवाणू व रसायनं असतात जे गर्भाच्या वाढीला अडथळा निर्माण करू शकतात.या पुस्तकात टाळावेत असे काही शाकाहारी व मांसाहारी पदार्थांची माहिती दिली आहे. हे पदार्थ का खाऊ नयेत, त्यामागील शास्त्रीय कारणं कोणती व खाल्ल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे देखील सांगितलं आहे. त्यामुळे गरोदर स्त्रीला आपला आहार ठरवताना योग्य ती सावधता बाळगता येईल.प्रत्येक गरोदर स्त्रीचं स्वप्न असतं, सुदृढ व लोभस बाळाचं! हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल.