"कुत्रा इमानदार असतो. घराची राखण करतो. त्याच्या सोबतीत मन गुंतून जाते. रूसला तर फुरंगटेल पण शेपटी हलवत स्वागतही करील.... घरात घुसणाऱ्या मुंग्या - उंदीर यांचा समाचार घ्यायला त्याला मम्मा-पप्पांना मदत कराविशी वाटेल... नाकाने हुंगून एखादी चोरीही तो पकडेल... आपला 'गुगी' ही असाच ! शिवाय त्याला मित्र-मैत्रिणी हव्यात, पार्टी हवी, अमेरिकेलाही जावंसं वाटतं... तो घरातल्या गप्पाही नीट ऐकत असतो! त्याच्या मनात खूप काही चालले आहे. भुंकतो - पण बोलत नाही. पण त्याच्या चेहऱ्यातून, डोळ्यातून, हालचालीतून त्याच्या भावना मम्मा म्हणजे विद्या डेंगळे पूर्ण ओळखून आहेत. त्यांनी छोटुकला गुगी मोठा आडदांड होईपर्यंत त्याच्या कल्पनाविश्वाचं, विचारांचं, करामतीचं हे 'गुगी पुराण' जणूकाही तो स्वतःच तुमच्याशी बोलतोय असं रंजकपणे रचलं आहे. ते तुम्हा मुलांनाच काय पण आम्हा मोठ्या माणसांनाही नक्कीच आवडेल!"
- लीलावती भागवत