एका पारधी मुलाचे आई-वडील नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडले. त्यानंतर त्या मुलाला सरकारी भरपाईही मंजूर झाली… पण हे पारधी कुटुंब त्या ‘गावचे रहिवासी’ नसल्यानं ती भरपाई त्याला मिळू शकली नाही. त्यावर तो म्हणाला, ‘आम्ही पारधी लोक काही आभाळातून पडलेलो नाही की पाकिस्तानातून आलेलो नाही, आम्ही याच देशात जन्माला आलो आहोत. आम्हा पारध्यांना गावात घर नाही, रानात शेत नाही. मग आम्ही एखाद्या ‘गावचे रहिवासी’ आहोत, असा पुरावा आम्ही कुठून आणणार..?’ त्या मुलानं विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नाही.एकीकडे आधुनिक व प्रगत देशातील उच्चभ्रू समाज चकचकीत, घरात राहतो, त्यांचे फर्निचर, बाथरूमही उच्च दर्जाचे असते. तर दुसरीकडे या समाजाला ना घर… ना गाव.. पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही यांचा प्रवास चालू आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही कुठपर्यंत असे दारिद्य्राचे जीवन त्यांनी जगायचे, एक माणूस म्हणून त्यांना त्यांचे हक्क, अधिकार कधी मिळणार..?अशा भटक्या-विमुक्त जाती-जमातींना माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी लेखक गेली चार दशकांपासून लढतोय आणि आजही हा संघर्ष सुरूच आहे.