हिंदी चित्रपटसंगीत ही आपली सगळ्यांचीच मर्मबंधातील ठेव आहे. जो कधी फिल्मी धुन गुणगुणला नाही, असा माणूसच जन्माला आलेला नाही. चित्रपटांतील गाण्याबजावण्याने एक मोठं कार्य केलंय. समाजाच्या विविध थरांतील, विविध जातीधर्मांच्या, विविध वयोगटाच्या, विविध वृत्तींच्या व विविध विचारसरणींच्या या खंडप्राय देशातील कानाकोपर्यात पसरलेल्या माणसांना एका धाग्यात गुंफणारा व सुरांनी बांधून ठेवणारा असा हा अनमोल खजिना आहे. त्याला कमी प्रतीचं, हलकं व सवंग मानल्याने त्याचे महत्त्व व कार्य कमी होत नाही. सबंध देश ‘धीर से आजा री’ किंवा ‘दीदी तेरा देवर दिवाना’ म्हणतो, तेव्हा राष्ट्रीय एकात्मतेची भावना आपसूक जोपासली जाते. संगीतात नवं-जुनं असं काही नसतं. जुनं ते सगळं चांगलं व नवीन ते सगळं वाई. असंही नसतं. कान ही एकमेव कसोटी व मोजपट्टी ठेवली, तर या नव्याजुन्याच्या संघर्षात तुम्ही अडकत नाही. मनमंदिरात मानाने विराजमान होणारे व तिथे दीर्घकाळ गुंजारव करणारे सूर हवेत. असे सूर व त्यांच्या सुरेल कहाण्या वाचकांपर्यंत आणण्याचे स्तुत्य काम अभिजीत देसाई यांनी केले आहे. सुरांचे नाते हे जन्मजन्मांतराचे असते. ज्याला आयुष्यात सूर सापडला, तो भवसागर पार करून गेला. - शिरीष कणेकर