कविता, कथा, कादंबरी आणि समीक्षा या क्षेत्रांतली लेखनाने मराठी साहित्य अर्थपूर्ण रीतीने समृद्ध करणारे विलास सारंग आता नाटकाकडे वळले आहेत या क्षेत्रातील त्यांची निर्मितीही अव्वल दर्जाची आहे हे त्यांच्या ‘गांधीजींचं माकड’ या नाटकावरून सहज लक्षात येते. व्यक्ती, समाज आणि संस्कृती यांचे परस्परसंबंध हा सारंगांच्या चिंतनाचा एक महत्त्वाचा विषय आहे. माणसाला नीट जगताही येऊ नये अशी कठोर व्यवस्था आणि माणसाला पाशवी पातळीपर्यंत नेणारे अराजक यांच्यातील
तोल कसा सांभाळायचा हा त्यांच्यासमोरचा यक्षप्रश्न आहे. ‘गांधीजींचं माकड’ या नाटकामधून सारंग पुन्हा या प्रश्नाला भिडले आहेत. अद्भुतिकेचा उपयोग करत या प्रश्नांनी आकाराला आलेले एक समांतर जग या नाटकामधून निर्माण केले आहे. व्यवस्थेवर उपरोधिक भाष्य करणारे हे नाटक प्रयोगक्षमतेच्या नव्या दिशांचा शोध घेणारे आहे.