ललित लेखन हा मालतीबाईंचा आवडता वाङ्मयप्रकार आहे. खरे म्हणजे नुसता आवडता नव्हे, तर त्यांच्या वृत्ती-प्रवृत्तीला मानवणारा आणि त्यांच्या भावस्निग्ध अंत:करणाला आविष्कृत होण्यासाठी पूर्ण खुला होऊ शकणारा वाङ्मयप्रकार आहे. ललित लेखकाजवळ जी असावी लागते ती बहुतेक सारी साधनसामग्री मालतीबाईंकडे आहे. उत्कट संवेदनशीलता आणि सहृदयता, उत्तम निरीक्षणशक्ती, क्षणांचे जिवंतपण नेमके पकडण्याची क्षमता, मानवी संबंधांविषयीची आस्था आणि उत्फुल्ल विनोदबुद्धी; शिवाय दीर्घकाळ केलेल्या मराठीच्या अध्ययन-अध्यापनाचा अनुभव आणि जाणती रसिकता. मालतीबाईंचे लेखन यामुळेच वेधक झाले आहे.