फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथां’ना सर्व वयोगटातील वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ‘रोहन प्रकाशन’ घेऊन आलं आहे – फेलूदाच्या एकूण ३५ कथांपैकी शेवटच्या ११ थरारक कथांचे ४ नवीन संग्रह; त्यातल्या या ३ कथा...१. माहितोष रॉय यांना धमकी देणाया चिठ्ठ्या वारंवार येत असतात. चौकशीअंती फेलूदाला असं समजतं की, काही दिवसांपूर्वीच एका नटाच्या बदल्यात रॉय यांना ‘अप्सरा थिएटर’ या कंपनीत घेतलेलं असतं. त्यामुळे तो नट त्यांच्यावर चिडलेला असतो. तसंच वडिलोपार्जित मालमत्तेत पुरेसा हिस्सा न मिळाल्याने रॉय यांच्या सख्ख्या भावाचाही त्यांच्यावर राग असतो. फेलूदाच्या चातुर्याचा कस लागतो अप्सरा थिएटर प्रकरणात!२. फेलूदा, तपेश आणि लालमोहनबाबू काश्मीरला फिरायला जायचं ठरवतात. तिथे त्यांची ओळख माजी न्यायाधीश मलिक यांच्याशी होते. मलिक हे शिक्षा दिलेल्यांच्या आत्म्यांशी संवाद साधतात आणि त्यांनी दिलेली शिक्षा योग्य होती की नाही, हे पडताळून पाहतात. अचानक फेलूदावर हल्ले व्हायला सुरुवात होते, आणि मलिक यांची निर्घृण हत्या केली जाते. आणि समोर उभा राहतो – नंदनवनातील धोका!३. लखनौला जाताना फेलूदाची श्रीयुत बिश्वास यांच्याशी ओळख होते. त्यांच्या घराण्याचा रंजक इतिहास ऐकताना असं समजतं की, एकेकाळी प्रसिद्ध असलेली नटी शकुंतला यांचा कंठहार त्यांच्याकडे जपून ठेवलेला आहे. एके दिवशी तो हार अचानक गायब होतो. पण मौल्यवान असलेला शकुंतलेचा कंठहार फेलूदा ‘युक्ती’ने शोधून काढतो!