‘आजच्या गतिमान काळात इंग्रजीवर प्रभुत्व मिळवणे फारच गरजेचे झाले आहे. जसे हिऱ्याला सोन्याचे कोंदण असले की, ते जास्त शोभून दिसते; तसेच इंग्रजीवर प्रभुत्व मिळाल्यामुळे होत असते. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला वेगळीच झळाळी मिळते. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असला तरी इंग्रजीवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. यासाठी चांगले वाचणे, बोलणे, लिहिणे आणि श्रवण करणे आवश्यक आहे. इंग्रजी बोलण्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी शब्दांची योग्य मांडणी करून वाक्य बनवता यायला हवे.चांगल्याप्रकारे इंग्रजी येते हे सध्याच्या काळातील उत्तम क्वालिफिकेशन आहे. त्यामुळे कामापुरती इंग्रजी बोलायला किंवा लिहायला आली की पुरे, असे अल्पसंतुष्ट राहून आजच्या काळात चालत नाही. तिच्यात प्रावीण्य मिळविणे आणि तिच्यावर प्रभुत्व असणे अतिशय आवश्यक झाले आहे. त्यादृष्टीनेच या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे.
इंग्रजी भाषेचे महत्त्व, इंग्रजी अवघड का वाटते, इंग्रजी शिकण्याची पूर्वतयारी, इंग्रजी शिकण्याच्या पद्धती, इंग्रजी पक्के करण्याच्या पायऱ्या, इंग्रजीवर प्रभुत्व कसे मिळवावे. शब्दसंग्रह वाढविण्यासाठी, इंग्रजी बोलण्या, लिहिण्यासाठी करावयाची पूर्वतयारी, वाचनकौशल्ये कशी विकसित करावीत, इंग्रजी बोलण्यावर प्रभुत्व मिळविण्यासाठी काय करावे यासारख्या प्रकरणांच्या माध्यमातून कुणालाही इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्याचा गुरुमंत्र अवगत करता येईल.