म्हातारपणी काय करावे हा एक प्रश्नच असतो. देव देव करीत दिवस कंठावेत किंवा आपले दुखते खुपते म्हणून कुरकुरीत राहावे! पण वैद्य आजींना हे पटत नाही. त्या म्हणतात, म्हातारी माणसे संसाराच्या सगळ्या कटकटीतून मुक्त झालेली असतात. मग ती काय हवे ते करू शकतात. वैद्य आजी महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वृद्धाश्रमात राहतात. त्या वृद्धाश्रमात प्रवेश केल्यापासून वैद्य आजींनी पुष्कळ काही 'उचापती' केल्या. त्यासाठी पुष्कळांशी भांडणं केली, पुष्कळ शिव्याशाप घेतले, पण आज त्यांच्या ‘उचापतीं'ना मधुर फळं आली आहेत. 'साठी' उत्तरीची त्यांची कहाणी सुफळ संपूर्ण झाली आहे. तिचीच ही हकीकत, त्यांच्याच शब्दांत !