विणकलेत अतिशय पारंगत असलेल्या प्रतिभा काळे यांनी विणकलेतील आपले कौशल्य विकसित करून या विषयावर भरपूर लिखाणही केलं. त्यांचं वैशिष्टय हे की त्यांनी सोप्या भाषेत लिहून इतरांना मार्गदर्शन करण्याचं तंत्र अवगत केलं आणि म्हणूनच त्यांची अनेक पुस्तकं आज प्रकाशित झाली आहेत. या नव्या पुस्तकात प्रतिभा काळे यांनी विणकामासंबंधी अनेक उपयुक्त सूचना, काही कानमंत्र, टाक्यांची सचित्र माहिती, विणींचे नमुने इ. प्राथमिक माहिती देऊन विविध वयातील लहान मुलांसाठी स्वेटर्स, टोप्या, बूट, फ्रॉक यांचे प्रकार दिले आहेत. त्याचप्रमाणे पंधरा ते पंचवीस वयोगटातील तरुण-तरुणींसाठीही अनेक आकर्षक प्रकारांचा समावेश केला आहे. मुख्य म्हणजे नव्या पिढीच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन नवे डिझाइन्स, नव्या फॅशन्स, नवे प्रकार यांना प्राधान्य दिलं आहे. सर्व प्रकारांची रंगीत, सुस्पष्ट छायाचित्रंही दिली आहेत.