मराठी भाषेच्या अस्तित्वासंबंधी व भविष्यासंबंधी जेव्हा चर्चा होते, त्यावेळी मराठीला ‘ज्ञानभाषा’ करण्याचा संकल्प मांडला जातो. परंतु त्यासाठी नेमके काय केले पाहिजे, ह्यासंबंधी लेखन व प्रयत्न फार अल्प प्रमाणात झाले आहेत. मराठी भाषा ज्ञानभाषेच्या स्तरावर जावी ह्यासाठी ह्या पुस्तकातील विविध प्रकरणांत चर्चा केली आहे. नव्या पिढीला ज्ञानभाषेच्या जवळ जाण्यासाठी कोणत्या व्यवस्थांची गरज आहे, ती स्पष्ट करणे एवढेच ह्या ग्रंथाचे स्वरूप आहे. लोकभाषा हीच ज्ञानभाषा व शासनाची भाषा असावी व त्या भाषेचा विकास लोकविकासाशी एकरूप झालेला असावा अशी अपेक्षा नवमहाराष्ट्राचे निर्माते कै. यशवंतराव चव्हाण यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या विचारांचे मोल लक्षात घेऊनच हा लेखनप्रकल्प ह्या पुस्तकाच्या निमित्ताने सिद्ध झाला आहे. ही चर्चा अधिक पूर्णतेकडे गेली व मराठीला‘ज्ञानभाषा’ बनवता आले, तर पुस्तक प्रकाशित करण्याचा हेतू साध्य झाला असे म्हणता येईल.