‘पोथीनिष्ठ समाजवाद ना देशाचे दैन्य दूर करू शकत, ना देशबांधवांचे दारिद्र्य नाहीसे करू शकत. हवे आहे ते निखळ व्यवहारज्ञान. मांजर काळे की गोरे यावर काथ्याकूट करीत बसण्यापेक्षा ते उंदीर फस्त करते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे!’ असा दृष्टिकोन ठेवून आधुनिक चीनची भक्कम उभारणी करणाऱ्या नेत्याचे - देंग झियाओपिंग यांचे हे चरित्र. साम्यवादी पक्षातली त्यांची जडणघडण, त्यांनी पार पाडलेल्या विविध जबाबदाऱ्या, त्यांना वैयक्तिक जीवनात आणि सार्वजनिक कारकिर्दीत सोसाव्या लागलेल्या व्यथावेदना, त्यांनी देशहित समोर ठेवून घेतलेले निर्णय व केलेल्या तडजोडी आणि अखेरीस समृद्ध, समर्थ चीनच्या रूपात त्यांनी मागे ठेवलेला वारसा... या साऱ्यांचे हे माहितीपूर्ण चित्रण.