दिलीपकुमार म्हणजे ‘शहजादा सलीम’. दिलीपकुमार म्हणजे ‘राम और शाम’. दिलीपकुमार म्हणजे ‘गंगा’. दिलीपकुमार म्हणजे ‘देवदास’ आणि ‘आझाद’ही. दिलीपकुमार म्हणजे असे अनेक नायक, अशा अनेक व्यक्तिरेखा. अभिनयाचा मानदंड प्रस्थापित करणारा हा अभिनेता केवळ त्याच्या चित्रपटांपुरता अन् त्याच्या भूमिकांपुरता उरला नाही. त्याच्या प्रत्येक भूमिकेत लसलसत होते भविष्यातल्या अभिनयाचे कोंब. गेल्या सत्तर-ऐंशी वर्षांत हिंदी सिनेमात वावरणाऱ्या कैक कलावंतांच्या अभिनयाला जीवनरस पुरवणारा जिवंत झरा म्हणजे दिलीपकुमार. स्वातंत्र्योत्तर आधुनिक भारताचं प्रतिनिधित्व करणारं सर्वांगसमृद्ध सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व म्हणजे दिलीपकुमार. अभिनयाच्या क्षेत्रात ‘दिलीपकुमारपूर्वी’ आणि ‘दिलीपकुमारनंतर’ असे कालखंड प्रस्थापित करणाऱ्या या प्रतिभावान कलावंताची नवरसांनी भरलेली चरितकहाणी.