अलोट देशभक्ती, पाश्चिमात्य शिक्षणाचे विवेकपूर्ण व साक्षेपी आकलन, हिंदुस्थानातील अंधश्रद्धाळू, अशिक्षित व दरिद्री बांधवांविषयी कळकळ या सर्व गुणांमुळे दादाभाईंचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या समकालीनांमध्ये व त्यांच्यानंतरच्या भारतीय नेत्यांमध्ये दीपस्तंभासारखे अढळ दिसते.फक्त भावनेच्या लाटेवर स्वार होऊन हिंदुस्थानाची प्रगती साधता येणार नाही, हे ते जाणून होते. ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवर त्यांचा विश्वास होता. म्हणून सनदशीर मार्गांनी कायद्याचे राज्य हिंदुस्थानात आणण्यासाठी त्यांनी अथकपणे जवळ-जवळ सात दशके क्रियाशील राजकारण केले. ब्रिटिश साम्राज्यातील पार्लमेंट सभेसाठी त्यांची निवड ही एक खरोखर ऐतिहासिक घटना होती.दादाभाईंपासून प्रेरणा घेऊन गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, उमेशचंद्र बॅनर्जी, बद्रुद्दीन तय्यबजी, मोतीलाल नेहरू, गोपाळ कृष्ण गोखले व महात्मा गांधी यांच्यासारख्या अनेक देशभक्तांनी कोट्यवधी जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे क्रत अंगीकारले. भारतीय राजकारणाचे ‘पितामह’ हे बिरूद्ध त्यांच्यासाठी अत्यंत यथोचित आहे.या पुस्तकात दादाभाईंनी केलेल्या हिंदुस्थानातील व इंग्लंडमधील विविध चळवळींचा, लंडनमधील पार्लमेंट सदस्यत्वाच्या कालखंडातील महत्त्वाच्या घडामोडींचा, त्यांच्या कौटुंबिक व हृद्य व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या कमिशनवरील नेमणुकींच्या कामाचा सविस्तरपणे आढावा घेतला आहे.