डॉ. सुहासिनी इर्लेकर यांची कविता स्वातंत्र्योत्तर कालखंडातील महत्त्वाची कविता मानली जाते. विविध वाङ्मयप्रकारात त्यांनी विपुल लेखन केले असले, तरी त्यांचा मूळ पिंड कवयित्रीचाच होता. डॉ. इर्लेकर यांची कविता कधी अंतर्मनाचा वेध घेते तर कधी आपल्या अस्तित्वाचाच. कधी त्यांचे गहिरे मन आणि मौन बोलके होते, तर कधी अंतर्मुख. कधी त्यांची कविता रोमँटिक स्त्रीकाव्याशी नाते सांगणारी, तर कधी अध्यात्माला जवळ मानणारी. कधी सामाजिक आशय घेऊन येणारी, तर कधी कोणत्याच मर्यादात न रमता मुक्त आकाशाचा वेध घेणारी आहे. अशा बहुविध रूपांनी सजलेल्या कवितांचे स्वागत रसिकांनी यापूर्वीच मनोभावे केले आहे. ‘तृप्ती’ ह्या पहिल्या कविता संग्रहातील (१९६१) काही कविता, तर २००१ ते २०१० ह्या काळात विविध नियतकांलिकांतून प्रसिद्ध झालेल्या कवितांचा हा संग्रह वाचकांना नक्कीच आवडेल.