‘स्व’ ची ओळख नसणार्या; पण एका सरंजामशाही, कुलीन कोषात जगणार्या स्त्रिया या संग्रहातील कथांतून साकार झालेल्या आहेत. काळ बदलत गेला तरी या कोषाची सीमा विस्तारली नाही की संकोचली नाही. वाड्याच्या भिंतीच्या प्रत्येक चिर्याने या स्त्रियांच्या वेदनांना वाड्याबाहेर आणि ओठांबाहेरही पडण्यास दक्षपणे प्रतिबंध केला. पदरी पडणार्या प्रत्येक दु:खाला ‘नशीब’ समजून हुंदके दाबीत गिळताना स्वत:च्या मनाशीही त्याचा उच्चार त्यांना करता आलेला नाही; म्हणूनच त्यांचे दु:ख जसे खानदानी जगण्याचे आहे तसे ‘स्त्री’ म्हणून जन्माला येण्याचेही आहे. समाजव्यवस्थेला बळी गेलेल्या या स्त्रियांचा हा मूक आवाज मराठी साहित्यात फारसा उमटलेला नाही.डॉ. रामचंद्र काळुंखे