मनात भूमिगत स्फोटासारखा उत्पात माजला होता. आजचा दिवस आयुष्यात येईल, असे कधी वा.ले नव्हते. लग्न झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस भीती वाटायची. पण बराच काळ काही घडले नाही आणि मनातली भयाची भावना हळूहळू विरत गेली. संपली. जुन्या आयुष्याचे संदर्भ मनातून हळूहळू पुसत जायलाही सुरुवात झाली होती. चहूकडून एक ठाम निश्चिंती येऊ लागली होती. प्रक्रिया घडत घडत भुसभुसीत मातीचा खडक होत जावा, तसे काही होऊ लागले होते. पण आज तो आला. सगळा भूतकाळ हिंस्र श्वापदाप्रमाणे तिचा घास घ्यायला समोर उभा ठाकला. दडलेली बुजलेली आणि इतरांपासून कायम लपवलेली जखम एका झटक्यात उघडी पडून पुन्हा भळाभळा वाहू लागली आणि ती इतरांना स्पष्ट दिसणार अशी भीती निर्माण झाली. पुरती हादरून गेली होती.