सुषमा वाकणकर यांची कविता प्रसन्न आणि खेळकर आहे. त्यांच्या प्रतिभेला चांदण्याचा सोस आहे, निसर्गक्रीडेचे भान आहे. हे सांभाळत असतानाच त्यांची कविता कधी चिंतनशील, तर कधी गंभीरही बनते. विशेषत: स्त्रीमनाचा शोध अन् उमलत जाणारे स्त्रीरूप हे खास अनुभवप्रदेशही कवयित्रीने कवितेच्या माध्यमातून संशोधून पाहिले आहेत, स्त्रीच्या अस्तित्वाच्या खुणांचाच शोध घेत घेत त्यांची कविता व्यक्त झाली आहे. कवयित्रीकडे असलेला स्निग्ध विनयशील भाव व रचनेचे सौंदर्य यामुळे या कविता वाचताना आपण काव्यरसिक म्हणून अधिक समृद्ध होत जातो.
- डॉ. द. दि. पुंडे