'चांदीच्या तोरड्या' हा श्रीनिवास ऊर्फ रंगा दाते यांचा पहिलावाहिला कथासंग्रह. यात बारा ग्रामीण कथांचा समावेश आहे. श्री. दाते हे प्रगतिशील शेतकरी, शेतकरी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते म्हणूनच संबंधितांना माहिती आहेत. त्यांचा जन्मच मुळी शेतकरी कुटुंबात झाला. उच्च शिक्षणही शेतकी याच विषयाचे झाले आणि आजवरचे आयुष्यही फक्त शेती आणि शेतीशी संबद्ध अशा व्यवसायात गेले आहे. आयुष्य आता साठीच्या वळणाशी आले आणि दात्यांना खर्या अर्थाने आत्मसाक्षात्कारच घडला. काळ्या आईची उपासना करणार्या दात्यांचे हात वेगळ्या प्रकारच्या सर्जनासाठी स्फुरू लागले. आंतरिक ऊर्मी बळावली आणि तिचा शब्दबद्ध आविष्कार कागदांवर उमटला. ही एक कथा होती. खुद्द दातेही या साक्षात्काराने स्तिमित झाले. त्यानंतर पुढल्या काळात लिहिल्या गेलेल्या कथांचा हा संग्रह.
श्री. दाते हे काही सराईत लेखक नाहीत; पण उत्तम कथालेखकाची प्रसादचिन्हे या त्यांचा पहिल्याच कथासंग्रहात जागजागी ठळकपणाने दिसून येत आहेत. अस्सल अनगड मोती हे कधीच गोलाकार असत नाहीत, त्याप्रमाणे या संग्रहातील कथा वरवर पाहता ओबडधोबड भासल्या, तरी त्यांतील जीवनानुभव हे अधिक जीवंत व रसरशीत वाटतात.