मगध देशाच्या नंद राजाच्या राजसत्तेचा सर्वनाश करून त्या जागी तीव्र बुद्धिमत्तेच्या शूर चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवणारे आचार्य विष्णुगुप्त चाणक्य हे कुशल राजनीतिज्ञ,आचार-विचारांचे मर्मज्ञ आणि कूटनीतीतील सिद्धहस्त म्हणून प्रसिद्ध आहेत.अभिजात संस्कृत साहित्यातील नीतिपर चाणक्यनीती समाज, राजकारण, धर्म आणि कर्माविषयी मार्गदर्शन करते.प्राचीन काळी लिहिलेल्या चाणक्यनीतीतील जीवनमूल्ये आजही तितकीच कालसुसंगत आहेत.वर्तमान परिस्थितीचे भान ठेवून चाणक्यनीतीतील 325 सूत्रांवर केलेले हे भाष्य आधुनिक युगातील मानवासाठी पथदर्शक ठरते.अमृत, सुवर्ण, विद्या आणि गुण ग्रहण करण्यास कधीही संकोच करू नये.मनी कल्पना केलेले काम तोंडाने सांगू नये. त्याचे गुप्त मंत्राप्रमाणे रक्षण करावे.ज्याप्रमाणे प्रत्येक पर्वतावर माणिक, पाचू प्राप्त होत नाहीत आणि सर्वच जंगलांत चंदन वृक्ष उपलब्ध होत नाहीत, त्याचप्रमाणे सज्जन लोक सर्व ठिकाणी भेटत नाहीत.मनन करणे, अध्ययन करणे आणि लोकांना मदत करणे ही मानवी जीवनातील अनिवार्य कर्तव्ये आहेत.आचरणामुळे मनुष्याच्या कुळाचा परिचय होतो. भाषेमुळे देशाचा पत्ता लागतो. आदर-सत्कारामुळे प्रेमाचा तसेच व्यक्तीच्या देहाकडे बघून तो ग्रहण करत असलेल्या अन्नाचा परिचय होतो.