केशव सखाराम देशमुख यांच्या भावविश्वाचे मुख्य घटक म्हणजे त्यांचे गाव, शेत आणि कुटुंब. या तिन्ही गोष्टी आपापले गहिरे रंग घेऊनच त्यांच्या कवितेत उतरतात. त्यांची कविता एक प्रकारचा ‘संवेदन प्रदेश’ बनते. देशमुखांच्या कवितेमध्ये आलेले ‘बापा’चे चित्रण तिला तिची स्वतंत्र ओळख आणि स्थान प्राप्त करून देते. पुरुषोत्तम मंगेश लाड यांनी आपल्या तुकारामचरित्रांत दाखवून दिल्याप्रमाणे बापलेकाच्या नात्याचे आणि बापाचे वर्णन तुकोबांच्या अभंगवाणीत पाहायला मिळते हे खरे आहे. परंतु त्यानंतर लुप्त झालेला कवितेतला हा ‘थीम’ आता देशमुखांच्या कवितेमधून पहिल्यांदाच प्रगट होतो आहे. या एकूण कवितेतून घरगोठ्यासकट, बैलबारदान्यासह शेतीच्या एक स्वायत्त विश्वाचेच दर्शन होते. गाई आणि बैलसुद्धा या विश्वाचे माणसांइतकेच नागरिक आहेत. विशेषत: बैल त्यांच्या कवितेत जणू नायक म्हणूनच वावरतात. जातक कथेंमधील गजराजांशी स्पर्धा करावी एवढ्या उंचीवर देशमुखांनी बैलांना नेऊन सोडले आहे. मराठी कवितेत एक वेगळे विश्व उभारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार्या या कवितेचे मनापासून स्वागत.
- सदानंद मोरे