रघुनाथ मिरगुंडे यांचा ‘बूमरँग’ हा तिसरा कथासंग्रह. ‘सूळ’ आणि ‘पुरस्कार’ या आधीच्या त्यांच्या संग्रहांनी वाचकांचे लक्ष चांगलेच वेधून घेतले होते.
प्रस्तुत संग्रहातील कथांचे शिल्प एखाद्या चवळीच्या शेंगेसारखे एकदम सरळसोट आणि सडसडीत आहे. पात्र-प्रसंगांची उगाच वर्दळ नाही की चिंतनाचा वगैरे धूप-दरवळ नाही. खेड्यावाड्यावरील साध्यासुध्या माणसांच्या जीवनात सहजपणे अवतरणार्या साध्यासुध्या पेचपर्वांच्या या हकिकती लेखकाने मोठ्या समरसतेने कथन केल्या आहेत. या कथांना लाभलेली भाषाही रानगंध प्यालेली गावाकडील बोलीच आहे. कालपटावरून हरवत चाललेल्या कित्येक अर्थपूर्ण शब्द-संवादांमुळे शैलीलाही एक रससशीतपणा प्राप्त झाला आहे.
एखाद्या कापराच्या वडीगत घडीभर उजळून मावळणार्या या छोटेखानी कथा त्यांतील रंजकतेमुळे मनात बराच काळ रेंगाळत राहातात; म्हणायचे तर ही या कथांची मर्यादा नि म्हणूनच मर्मस्थानही. या कथांचा भूगोल आणि भूमिती दोन्ही अटकर; त्यामुळे कथांची अंगकाठी कुठेही थुलथुलीत होत नाही. गेली पन्नासेक वर्षे मिरगुंडे हे कथा लिहीत आहेत. तरी अजून त्यांच्यातील कथाकार आपल्याच पायांखालची ऊनसावली पाठीवर घेऊन चालतो आहे, ही गोष्ट खूपच सुखावणारी आहे. - वसंत केशव पाटील