तो देवदूतासारखा सुंदर आणि निरागस होता! पण देवदूताला शत्रू नसतोच असं कसं म्हणता येईल? त्याच्या साध्या, निष्कपट स्वभावामुळे व राजबिंड्या व्यक्तिमत्वामुळे केवळ असूया व जन्मजात दुष्टाव्यातून त्याच्याविरुद्ध कट रचला गेला. राजद्रोही कारवायांना चिथावणी देण्याचा तद्दन खोटा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. ह्या सार्या कारस्थानाबाबत तो अनभिज्ञ होता. त्याचा बळीच दिला गेला! हर्मन मेलविलच्या 'बिली बड' ह्या हृदयस्पर्शी कहाणीचे कथानक केवळ सामाजिक, राजकीय, धार्मिक वास्तवाच्या नव्हे तर नीतिशास्त्र आणि अध्यात्माच्या पातळीवरही अर्थपूर्ण बनते, ते केवळ मेलविलच्या प्रतिभाशाली रूपक - प्रतीक - प्रतिमांच्या कलात्मक वापरामुळे! - तरीही, साधे वास्तववादी कथानक म्हणूनही, ते विलक्षण पकड घेते. 'बिली बड' ह्या लघु कादंबरीचा अतिशय उत्तम असा सहज, सर्वांगसुंदर अनुवाद करताना डॉ. चंद्रशेखर चिंगरे यांनी मेलविलच्या लेखनशैलीची वैशिष्ट्येही जपली आहेत हे विशेष!