त्यांना स्वत:ला आता स्वत:चं ते दुसरं रुप दिसलं. गणपतराव विस्फारल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होते आणि मग त्यांनी आपल्या थकलेल्या शरीराने उठून बसण्याची एक क्षीण, केविलवाणी धडपड केली. लाल अंगरख्यातला आकार दात विचकून हसत हसत पुढे सरकत होता, कॉटवर वाकत होता. गणपतरावांच्या तोंडून एक अर्धवट गुदमरल्यासारख्या आवाज आला आणि त्यांचा चेहरा रमाबाईंकडे वळला. चेहरा पांढरा पडला होता, डोळे वटारले होते, घसा आवळला होता; काहीतरी बोलण्याची त्यांची निष्फळ धडपड चालली होती. तो एक क्षण ते दोन्ही चेहरे रमाबाईंकडे पाहत होते. एक भेदरलेला, पांढराफेक, काहीतरी बोलण्याची धडपड करणारा; दुसरा विचकलेल्या दातांचा, व्क्रर, दुष्ट, मत्सराने भरलेला….आणि मग गणपतराव किंचाळले रमा!…. मी….. मी…. मी….वळून ते एकदम वेडेवाकडे पडले. तोंड उघडं होतं. वटारलेले डोळे छतावर खिळले होते. छातीची हालचाल शेवटी थांबली होती.आणि मग ते दुसरे गणपतराव कॉटला वळसा घालून सावकाश त्यांच्या दिशेने यायला लागले. डोळे आता एका सैतानी विजयाच्या धुंदीत पेटून उठले होते. रमाबाई जागच्या हलल्याही नाहीत. त्यांच्या मनात भीती, आशा या भावनांना जागाच नव्हती. त्या शेवटच्या काही क्षणांत आता काय होणार आहे याची पुरेपूर कल्पना त्यांना आली होती; पण आता सर्व भावना थिजल्या होत्या. त्यालाच काय, कशालाच काही महत्त्व नव्हतं.