एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश राजवटीतील शिक्षणामुळे भारतीयत्व गमावून बसलेली पिढी निर्माण होत होती. मिशनऱ्यांच्या कार्यामुळे धर्मांतरे वाढली. हिंदू धर्माची निंदानालस्ती होऊ लागली, राजकीय क्षेत्रात अपयश आले व पारतंत्र्याची बेडी घट्ट बसली. या सर्व कारणांमुळे हळूहळू इंग्रजांविरुद्ध लोकमत तयार होऊ लागले. याच सुमारास आपले गेलेले वैभव परत मिळविण्याच्या हव्यासापोटी काम करणारी मंडळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करू लागली. या कार्यातूनच शिक्षणाच्या दृष्टीने एका नव्या पर्वास सुरुवात झाली.सयाजीराव गायकवाड, म. जोतिबा फुले, लोकमान्य टिळक, शाहू महाराज, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या १० शिक्षणतज्ज्ञांच्या कार्याचा आणि जीवनाचा आढावा या पुस्तकात आहे. त्यांनी या काळात खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्रांती केली. या सर्व व्यक्ती शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत म्हणून कशा आहेत, यासोबतच एक व्यक्ती म्हणून कशा आहेत हे प्रस्तुत पुस्तकातून आपण जाणून घेऊ शकू. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’प्रमाणेच या १० व्यक्तींची प्रकृती भिन्न होती; पण उद्देश मात्र एकच होता, तो म्हणजे शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार.भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंतांनी आपापल्या क्षेत्रात असामान्य कर्तृत्व दाखविले आहे. ते लोकसमर्पित होते. त्यांचे समाजावर प्रेम होते: राष्ट्रनिष्ठा मनस्वी होतीः विचार भविष्याचे वेध घेणारे होते; त्यांचे आचार जगण्याचे मार्ग दाखवित होते. अशा या महान व्यक्तींनी शिक्षणाबद्दल काही विचार सांगितले आहेत. त्यानुसार अनेक कार्येही त्यांनी करून दाखविली आहेत.