‘बेधुंद’ ही जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा (फाइव्ह स्टार्स) या पाच मित्रांची कहाणी आहे. एकाच कॉलेजमध्ये शिकणारे हे पाच जण वसतिगृहात राहत असतात. या पाच तरुणांच्या निमित्ताने कॉलेज जीवनाचा वेध या कादंबरीतून घेतला आहे. जया आणि हर्षलाच्या निमित्ताने आंतरजातीय विवाहाला होणारा विरोध, या पाच जणांवर सुरुवातीला सीनिअर्सकडून झालेल्या रॅगिंगच्या चित्रणातून रॅगिंगचा प्रश्न, अक्षा आणि सोनिया आणि अन्य मुलामुलींच्या माध्यमातून ‘सेक्स’चा अनुभव, या पाचही जणांच्या दारू पिण्यातून व्यसनाधीनता, सुऱ्या आणि पिया यांच्यात होणारं सेक्स चॅटिंग, काही उत्सव साजरे करत असताना विद्याथ्र्यांमध्ये जातीयवादावरून झालेली भांडणे इ. विषयांचं वास्तव चित्रण या कादंबरीतून केलं गेलं आहे. कॉलेज जीवनाची ही काळी बाजू समाजावरही विघातक परिणाम करू शकते, असा गर्भित इशारा या कादंबरीतून मिळतो. तेव्हा कॉलेज जीवनातील हे दाहक वास्तव जाणून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.