पृथ्वीवरील उत्तर ध्रुव प्रदेशाभोवतालच्या बर्फमय भूमीस आर्क्टिक सर्कल म्हणतात. तिथे हिवाळ्यात दिवसाचे तास कमी व रात्र मोठी असते. अशा ठिकाणी, ’बेअर आयलन्ड’ बेटावर आपले फिल्म युनिट नेऊन चित्रीकरण करण्याचा घाट एका निर्मात्याने घातला. आवश्यक ती सेटिंग्ज सामान-सुमान व माणसे घेऊन एका बोटीने तो तिकडे निघाला. पण वाटेत त्याच्या युनिटमधील काही जण मरण पावू लागले. तर काही जण ’बेअर आयलन्ड’ बेटावर मरण पावले, आणि जन्म झाला एका गूढ नाट्याचा. याचे मूळ दुसऱ्या महायुद्धात होते. अफाट संपत्ती, महायुद्ध व मनुष्यहत्या यांच्यातून एक जबरदस्त हिंसाचार उफाळून आला. संशयाचे काटे सर्वांवर फिरत होते, पण खूनी नक्कीच हुशार व मुरलेला होता. शेवटपर्यंत गूढ वाटणारी ही कादंबरी वाचकांची उत्कंठा कायम राखून ठेवते. एक गुंतागुंतीची विलक्षण कथा, मराठीत प्रथमच!