बटाटा हा सर्वसामान्यपणे सर्वांनाच रुचणारा असा आहे. म्हणूनच बटाटयाचा वापर आपल्या रोजच्या खाण्यापिण्यात नानाप्रकारे होत असतो.विविध भाज्या-उसळींमध्ये, आमटी-रश्यांमध्ये, भाताच्या प्रकारांमध्ये तर चवीसाठी बटाटा घातला जातोच, परंतु बटाटयाचा समावेश प्रामुख्याने असणारे अनेक पदार्थही अतिशय लोकप्रिय आहेत.पाककलानिपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे या पाककलेत सातत्याने नवनवे प्रयोग करत असतात. त्यांच्या या प्रयोगशीलतेतूनच हे पुस्तक साकार झाले आहे.या पुस्तकात पारंपरिक ‘भजी’पासून ‘बर्डस् नेस्ट’ अशा आधुनिक पदार्थापर्यंत स्नॅक्सचे अनेक पदार्थ आहेत, बटाटयाच्या साध्या भाजीपासून ‘पुदिनेवाले आलू’पर्यंत भाजी-रश्यातही विविधता आहे. बटाटयाच्या पराठयाचे अनेक प्रकार आहेत, त्याचप्रमाणे गोड पदार्थही आहेत.या पुस्तकामुळे सर्वांच्या आवडीचा बटाटा वेगवेगळ्या रूपात व विविध चवीत रसिकांना एकत्रितपणे उपलब्ध होणार आहे.