वाघाच्या थोड्या खालच्या अंगाला एक किशोर. पंधरा-सोळा वर्षांचा. हाफ पँट, हाफ शर्ट अशा वेशातला. पायी मोजे. शिकारी बूट. डोक्यावर शहीद भगतसिंगांसारखी कॅप. ओठावर कोवळी मिसरूड. हातातली शॉटगन वाघावर रोखून निडर उभा.डायरीची पानंही भारी कागदाची. काळाच्या ओघात किंचित पिवळी पडलेली. त्यावर काळ्या दळदार अक्षरातलं लिखाण; पण जागोजागी फिकट झालेलं.डायरी बहादर नावाच्या किशोरानं लिहिलेली आहे त्याच्या अनुभवाच्या नोंदी त्यानं केल्या आहेत. प्राध्यापक आनंद यांनी त्या सलग जुळवल्या. काही रटाळ, रुक्ष नोंदी गाळल्या. बहादूरचं प्रथमपुरुषी निवेदन तृतीय पुरुषी केले. त्याच्या सरळधोट भाषेवर डौलदार साज चढवला. डायरीला कादंबरीचं रूप दिलं. डायरीतील स्थळांची वर्णनं वाचून त्यांचा नकाशा तयार केला सरांचे मित्र पंढरीनाथ यांनी.रानाशी प्रामाणिक असलेले आजम चाचा जीवदयेचे कोणतेही अवडंबर न माजवता बहादूरला सांगतात. “जंगलात कोणताच जीव कणाशी दश्मनी करीत नाही, फक्त भुकेसाठी शिकार करतो, ती ही भुकेपुरतीच. कसलंही कारण नसताना माणसं मारणं ही खराब आदत आम्हा माणसांची.”