लिहिणार्याच्या नावागावाचा पत्ता नसलेले एक पोस्टकार्ड मला इतक्यात मिळाले. त्यात लिहिले होते -
पूज्य श्री. फादर वालेस,
सादर प्रमाण.
तुमची पुस्तके मला फार आवडतात. त्यातून मी खूप काही शिकलो आहे. मात्र तुमच्या जीवनाविषयी मला काहीच ठाऊक नाही. तुमच्या पुस्तकाच्या पाठीवरचा थोडासा मजकूरच मला माहिती आहे.
म्हणून माझी आणि माझ्या सगळ्या मित्रांची अशी विनंती आहे की, तुम्ही तुमचे आत्मचरित्र लिहा किंवा तुमच्या आयुष्यातील आठवणींचे पुस्तक लिहा. जेणेकरून आम्हाला तुमच्याविषयी काही माहिती मिळेल.
एक किशोर
हे कार्ड वाचताना मजा वाटली आणि आनंद झाला. पत्ता नव्हता त्यामुळे उत्तर पाठवता आले नाही, पण मजा याची वाटली की, हे पत्र मिळाले तेव्हा माझे हे आत्मचरित्र छापखान्यात छापले जात होते. या योगानुयोगामध्ये मला या कार्यात देवाचा आशीर्वादच दिसला आणि त्याचा खूप आनंद झाला.
हे पुस्तक जर त्या अनोळखी युवकाच्या हातात पडले तर त्यालाही आनंदच होईल ना!