स्वत:चे जीवनानुभव केंद्रस्थानी ठेवून कादंबरी-लेखनाच्या प्रकाराने मराठीत अलीकडील काळात जोर धरलेला आहे. या प्रकाराला मराठीत ‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ असे नामाभिधान प्राप्त झालेले आहे. इंग्रजीत याला ‘ऑटो-नॉव्हेल’ म्हणतात. हा ‘कादंबरी’ या वाङ्मयप्रकाराचाच एक
उपप्रकार होय. डॉ. महालक्ष्मी मोराळे यांनी या पुस्तकात आत्मचरित्रात्मक कादंबरी या वाङ्मयप्रकाराची संकल्पना,अशा प्रकारच्या
कादंबर्यांचे स्वरूप आणि मराठीतील अशा कादंबर्यांचा प्रवाह यांची चर्चा केलेली आहे. याच बरोबर डॉ. मोराळे यांनी ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’, ‘करुणाष्टक’, ‘झोंबी’ यांसारख्या मराठीतील १४ निवडक कादंबर्यांचा अभ्यासही येथे केलेला आहे. तसेच ‘बलुतं’, ‘साता उत्तराची कहाणी’, ‘आहे मनोहर तरी’ यांसारख्या कादंबरीसदृश काही आत्मपर कलाकृतींवरील आपली निरीक्षणेही त्यांनी मांडलेली आहेत. वाङ्मयाच्या एका नव्या उपप्रकाराची चर्चाचिकित्सा करणारे हे पुस्तक अभ्यासकांच्या ज्ञानात मूलभूत भर घालणारे आहे.