श्री. बाळ ज. पंडितांनी विपुल लेखन केलं. त्यातील निवडक वेचे घेताना असं लक्षात आलं की आपल्या क्रिकेटविषयक लेखनात जरी त्यांची खासियत असली तरी त्यानी आयुष्यभर केवळ क्रिकेटवरच लिहिलेल नाही. तर अन्य विषयातही त्यांनी आपल्या अंगी असलेली रुची आपल्या उत्कृष्ट लेखनाद्वारे अभिव्यक्त केली आहे. त्यामुळे क्रिकेटबरोबरच इतर काही लेखनाचा या 'निवडक' ग्रंथात आवर्जून समावेश केला आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर आणि त्याच्या पराक्रमावर लिहिणारा लेखक, जगन्नाथ महाराज पंडित आणि लोकमान्य टिळक यांच्यावर कसा लिहितो ते इथं पहायला मिळतं; क्रिकेटच्या सामन्यावर भाष्य करणारा लेखक खेळाच्या तांत्रिक अंगोपांगाबद्दल कसा उहापोह करतो ते इथं जाणवायला लागतं आणि परिचयलेखनात मश्गुल होणारी या लेखकाची लेखणी व्यक्तिचित्रणातही कशी रंगते ते पहायला मिळतं.हे सर्व क्रिकेटविषयक लेखन करताना श्री. पंडिताना विनोदाचं वावडं नाही याची प्रचिती या ग्रंथातील रंगतदारकिस्से आणि विनोदी ललितलेखन वाचून वाचकांच्या प्रत्ययाला येईल.अशा या श्री. पंडितांच्या समग्र लेखनातील ही काही पानं वाचताना आपणही काही काळ त्या वातावरणातरममाण होतो.