लोककवी मनमोहन यांची जन्मतारीख ११-११-११ अशी निर्सगाशी अद्भुत लय साधणारी होती. यंदाचे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे आहे. जयवंत दळवी यांच्या शब्दात "चंद्र सूर्याची बटणे खमिसाला लावणारा माणूस" असा हा लोकविलक्षण कवी होता. अनेक ऐतिहासिक, सामाजिक कादंबऱ्या, असंख्य कविता, क्रिकेटवरती लेख अशी मनमोहन यांची चौफेर ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. अत्यंत प्रतिभावान परंतु मनमानी, मनस्वी, मनोवृत्ती यामुळे या कविची सरस्वतीच्या दरबारात उपेक्षा झाली. या जन्मशताब्दीच्या निमित्याने अनेक साहित्यिकांनी त्यांना केलेला मानाचा मुजरा या पुस्तकात एकत्रित केला आहे." शव हे कविचे जाळू नका हो। जन्मभरी तो जळतचि होता। फुले तयावर उधळू नका हो। जन्मभरी तो फुलतचि होता । " लोककवी मनमोहन