‘अशी होती शिवशाही ’ हा रूढार्थाने शिवशाहीचा इतिहास नाही. ‘म-हास्ट राज्या’चे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू त्यांच्याच शब्दांत इतिहासाच्या समकालीन अस्सल साधनांवरून उकलून दाखवण्याचा प्रयत्न येथे केला आहे. शिवाजीराजे हे केवळ लष्करशहा नव्हते , तर ‘बहुतजनांसी आधारु’ असे ‘श्रीमंत योगी’; जाणते, रचनात्मक कार्य करणारे, काळाच्या पुढे जाणारे मुत्सद्दी राजे होते, हे त्यांच्या विविध धोरणात्मक पत्रांवरून येथे मांडले आहे. हे राज्य सर्वांचे आहे, असा पक्का अभिमान त्यांनी मराठी माणसांत निर्माण केला. ‘मोडिले राज्य तिघे ब्राह्मण आणि तिघे मराठे सावरतील ’, असा आत्मविश्वास त्यांना होता. ‘रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग ’ हे मनात बाळगून मोठ्या झुंझारपणाने मराठे स्वातंत्र्यासाठी लढले. सामान्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून, इतिहासाशी इमान राखून, पण ललित अंगाने ‘शिवशाही’ लोकांपर्यत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न आहे.