भारत हा जगाच्या पाठीवरील बहुदा एकमेव देश असेल ज्याचा प्राचीन, वैभवशाली इतिहास नेहमीच मोडतोड करून, मोठ्या प्रमाणात दिशाभूल करून सादर करण्यात आला आहे. वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या शक्तींनी, वेगवेगळ्या कारणांसाठी हे केलं असलं तरी त्यांचे स्वार्थ एकमेकांशी जुळत असल्यामुळे गेली १५०-२०० वर्ष ही दिशाभूल अविरत सुरुच आहे. संपूर्ण असत्य आणि काल्पनिक गोष्टी कुठलाही पुरावा नसताना 'इतिहास' म्हणून प्रस्थापित करण्यात आल्या आहेत, तसंच शेकडो पुरावे असलेल्या घटना ‘घडल्याच नाहीत' म्हणून बेदरकारपणे नाकारण्यात आल्या आहेत. इतकंच नव्हे, तर या खोटेपणाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आणि खरा इतिहास सांगू पहाणाऱ्यांना 'प्रतिगामी', 'धर्मांध' ठरवून वैचारिक क्षेत्राच्या परीघावर ढकलून देण्यात आलं आहे आणि त्यांचं प्रतिपादन जगासमोर येणारच नाही अशा रितीने दडपून टाकण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षात, काही विद्वान संशोधकांनी या वैचारिक दडपशाहीविरुद्ध हार न मानता भारताचा खरा इतिहास सप्रमाण जगासमोर आणणारं मौलिक संशोधन केलं आहे. आजवर भारताच्या इतिहासाबद्दल करण्यात आलेली दिशाभूल देशासाठी फारच हानीकारक ठरली आहे. कारण यामुळे भारतीयांच्या कित्येक पिढ्या न्यूनगंड आणि पराभूत मनोवृत्तीचा बळी ठरल्या आहेत. म्हणूनच या संशोधनाचं मूल्य अपार आहे. वैदिक काळापासून स्वातंत्र्ययुद्धापर्यंत इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर झालेली दिशाभूल मराठी वाचकांसमोर यावी यासाठी हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.