अत्यंत यशस्वी लोकांबद्दल साधारणतः नेहमीच एक कथा सांगितली जाते. त्या कथेत असे नेत्रदीपक यश मिळवणाऱ्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि महत्त्वाकांक्षेबद्दल बोलले जाते; परंतु ‘असामान्य व्यक्तींच्या यशाची गुपिते’ या पुस्तकात माल्कम ग्लॅडवेल असा मुद्दा मांडतात की, यशाची खरी कहाणी यापेक्षा फार वेगळी असते. आपल्याला समजून घ्यायचे असेल की, काही असामान्य व्यक्ती यशाच्या उत्तुंग शिखरावर का पोहोचल्या, तर केवळ त्यांची बुद्धी, महत्त्वाकांक्षा यावर लक्ष केंद्रित न करता त्यांच्या ‘अवतीभवती’ नजर टाकली पाहिजे; त्यांचे कुटुंब, त्यांचे जन्मस्थळ किंवा अगदी त्यांची जन्मतारीख अशा गोष्टींचादेखील विचार करायला हवा.असामान्य कर्तृत्व असलेली काही महान व्यक्तिमत्त्वे अशी आहेत जी आजही आपणास सर्वपरिचित नाहीत. ती व्यक्तिमत्त्वे यशाचे अदृश्य वाटेकरी ठरतात. अशा व्यक्तींच्या यशस्वितेमागे कोणकोणत्या पूरक गोष्टींचा वरदहस्त होता याविषयीचे तर्कनिष्ठ विवेचन या पुस्तकात आले आहे. प्रतिकूल परिस्थितीतूनही अशी व्यक्तिमत्त्वे यशस्वी कशी होतात याचे गमक ग्लॅडवेल यांनी स्पष्ट केले आहे.माल्कम ग्लॅडवेल हे आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रीचा उच्चांक मोडणाऱ्या मोठ्या परिणामांच्या छोट्या गोष्टी’ आणि ‘ब्लिन्क’ या पुस्तकांचे लेखक आहेत. त्यांचे ‘असामान्य व्यक्तींच्या यशाची गुपिते’ हे पुस्तक म्हणजे यशाला समजून घेण्याची आपली दृष्टी बदलून टाकणारे आहे. माल्कम ग्लॅडवेल यांनी त्यांच्या या पुस्तकात जगाला समजून घेण्याचा मार्गच बदलून टाकला आहे.