समाजसंस्कृती आणि इतिहासाचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत, निर्भीड पत्रकार, मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक अशी टिकेकरांची विविधांगी ख्याती होती. पत्रकारितेच्या पेशाची तांत्रिक बाजू, त्याचे व्यवस्थापन याची त्यांना सखोल माहिती होती. एक अभ्यासू ग्रंथप्रेमी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील या सर्व पैलूंचा ऊहापोह या पुस्तकात व्हावा असा प्रयत्न केलेला आहे.
आप्त, मित्र, सहकारी, सदर-लेखक, संशोधक अशा विविध टिकेकरांच्या नात्यांनी सहवासात आलेल्या ज्येष्ठांना या पुस्तकासाठी लिहिण्याची आम्ही विनंती केली. विचारवंत, संपादक, मार्गदर्शक, सुहृद असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक कंगोरे या पुस्तकातील लेखांमधून पुढे आले. त्यांच्यावर प्रेम करणार्यांना, अभ्यासकांना आणि पत्रकारांच्या पुढील पिढ्यांनाही हे पुस्तक त्यादृष्टीने अत्यंत मोलाचे ठरणार आहे.