अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी हा ग्रंथ बहुत मराठी वाचणारांस ठाऊक असेल. हा ग्रंथ मूळचा अरबी भाषेत आहे. त्या भाषेतून त्याचे फ्रेंच भाषेत भाषेत भाषांतर झाले व फ्रेंच भाषेतून इंग्रजीत आणि इंग्रजीतून मराठीत झाले. या गोष्टींचा सुरसपणा व मनोरंजकपणा जगन्मान्य आहे. या ग्रंथाची भाषांतरे युरोपातील सर्व भाषांत झाली आहेत; व आजपर्यंत त्याच्या शेकडो आवृत्त्या झाल्या आहेत. वाचता येत असून ज्याने हा ग्रंथ वाचला नाही, असा मनुष्य युरोपात किंवा अमेरिकेत, किंबहुना जेथे जेथे युरोपियन भाषा माहीत आहे तेथे सापडणॆ विरळा. तेव्हा जो ग्रंथ सर्व सर्व काळात व सर्व देशांत आवडला आहे, त्याच्या अंगी वास्तविक मनोरंजन करण्याचे सामर्थ्य असले पाहिले हे स्पष्ट आहे.