विख्यात अणुशास्त्रज्ञ, स्वदेशी बनावटीच्या भारतीय क्षेपणास्त्रांचे शिल्पकार, डी.आर.डी.ओ.चे संचालक या नात्याने जनसामान्यांना सुपरिचित असणारे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आता भारताचे राष्ट्रपती झाले आहेत. त्यांच्याबाबत, त्यांच्या कार्याबाबत त्यांच्या लोकप्रियतेला साजेसे विपुल लेखन झाले असले तरीही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू पुरेसे प्रकाशात आलेले नाहीत. एक मनस्वी, वृक्षप्रेमी पर्यावरणवादी...जिवाभावाचे सख्य जोडणारा एक वडीलधारा...ज्याचे जे श्रेय ते त्याला जाहीरपणे देऊ करणारा दिलदार संघनायक... आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावून जाताना नोकरशाहीची कुंपणे ओलांडणारा मानवतावादी... कार्यासक्ती हा आपला गुण इतरांच्याही अंगी बाणावा यासाठी धडपडणारा एक हाडाचा शिक्षक...अशा विविध पैलूंवर त्यांच्या निकटवर्तीयांनी आठवणींच्या रूपाने टाकलेला हा प्रकाशझोत. डॉ. कलामांचे व्यक्तिमत्व त्यामुळे अधिकच झळाळून उठले, तर आश्चर्य वाटायला नको. `इस्त्रो'मधल्या त्यांच्याच एका जिवलग मित्राने डॉ. कलामाच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला वेध त्यांच्याबद्दलच्या आदरभावात भर घालतो, हेच त्याचे वैशिष्ट आहे.