सद्या विविध माध्यमांचे आणि विशेषत: वृत्तपत्रांचे महत्त्व सर्वमान्य झाले आहे. वृत्तपत्रांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो, पण ह्याला आज बाजारू स्वरूप येत चालले आहे. एका बाजूने पत्रकारांच्या धाडसी व शोधवृत्तीचे कौतुक केले जात आहे, तर दुसर्या बाजूला समाज त्यांच्याकडे संशयीत वृत्तीने पाहत आहे. ह्या पार्श्वभूमीवर राजू नायक यांचे वेगळेपण स्पष्ट होते. प्रामाणिक व परखड पत्रकारांचे ते प्रतिनिधी आहेत. सत्ताधारी,
विरोधी व प्रस्थापित लोकांविरोधी त्यांची लेखणी जशी चालते, तशीच सर्व सामान्य लोकांचे प्रश्नही ते धसास लावताना दिसतात. येथे लोकांच्या चुकांवरही ते प्रहार करायला विसरत नाहीत. एकूणच तटस्थ आणि नीर-क्षीर विवेक बुद्धीने पत्रकारिता करताना जवळचा-लांबचा असा भेदभाव न करता ते निर्भिडपणे लिहीत असतात. पर्यावरण हा त्यांचा सद्याचा खास विषय. गोव्याचे उद्ध्वस्तीकरण व पर्यावरण र्हास यांवर ते अतिशय पोटतिडकीने व तळमळीने लिहीत आले आहेत. ह्यावर त्यांनी वृत्तपत्रांतून लेखमाला लिहिल्या आहेत. ह्या लेखमालांतील निवडक लेखांचा हा संग्रह आहे. राजू नायक यांचे हे लेखन अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
अन्यथा हा देश उद्या नक्षलवाद्यांचा देश बनणार नाही, ह्याची खात्री कोणालाही देता येणार नाही.